मुंबई-गोवा हायवेवरील दुतर्फा रस्त्याच्या मधोमध लावण्यात आलेली फुलझाडे गेली सुकून!

 नियोजना अभावी लाखो लिटर पाणी तसेच लागवडीचा खर्च गेला वाया,अद्यापही सावलीची प्रतीक्षा!

करोडो रुपये घेऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा:-जनतेची मागणी!

 कोलाड:- (विश्वास निकम ) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील दुतर्फा रस्त्याच्या मधोमध लाखो फुलझाडे लावण्यात आली असुन त्याचा नियोजन मात्र शुन्य असल्यामुळे नको त्या वेळी पाणी मारून लाखो लिटर पाणी वाया जात असुन लावण्यात आलेली फुलझाडे सुकून गेली व शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये वाया जात असल्याचे दिसून येत आहे.तसेच रस्त्याच्या दुतर्फा उंच झाडे लावली गेली नसल्याने प्रवाशी वर्गाला सावळीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

                 मुंबई-गोवा हायवेवर नंदनवन फुलावा या उद्देशाने दुतर्फा रस्त्याच्या मधोमध फुलझाडे लावण्यात आली परंतु ही फुलझाडे जुन महिन्यात पावसाळा सुरु झाल्यानंतर लावली असती तर ती जगली असती परंतु पावसाळा संपल्यावर ही फुलझाडे लावण्यात आली  त्यांना वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे तसेच ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे ही फुलझाडे सुकून गेली आहेत.

                      तापमानाचा पारा ३८ अंशाच्या वर गेला असुन अशा तापमानात भर दुपारी पाणी मारल्याने हे  लाखो लिटर पाणी वाया जात आहे. कारण या कडक उन्हात माती गरम होत असुन यामुळे फुलझाडांना मारलेले पाणी मुलापर्यत जाऊन गरम होत आहे यामुळे ही फुलझाडे सुकून गेली आहेत. याउलट हाच पाणी सकाळी नऊ वाजता व संध्याकाळी ५ च्या नंतर मारला असता तर काही प्रमाणात काही फुलझाडे जगली असती परंतु लागवड केलेल्या फुल झाडांना भर उन्हात पाणी मारल्यामुळे ही फुलझाडे सुकून गेली आहेत. याला जबाबदार कोण ठेकेदार की ठेकेदारावर वचक नसलेला शासन असे प्रवाशी वर्गातून बोलले जात आहे.

          मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी रस्त्याच्या दुतर्फा वर्षनुवर्षे उभी असणारी भली मोठी असणारी झाडे तोडण्यात आली परंतु त्याच्या जागी नवीन झाडे लावण्यात आली नाही. यामुळे यामार्गांवरून प्रवास उन्हाच्या रखरखाटामध्ये करावा लागत आहे.रस्त्याच्या दुतर्फा सावली देणारी उंच वाढणारी वड, पिपंळ, व इतर झाडे लावण्यात आली नसल्याने दिवसेंदिवस पर्यावरणाच्या साखळीत बाधा येऊन धोका निर्माण झाला आहे.

           मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील चौपदरीकरणाच्या कामाला १८ वर्षे पूर्ण झाली तरी हे काम पूर्ण होईना.या कामासाठी तोडण्यात आलेल्या झाडांच्या जागी नवीन झाडे लावली असती तर अद्याप ती मोठी झाली असती.परंतु या मार्गांवर नवीन झाडे लावली गेली नसल्याने याचा फटका प्रवाशी वर्गाला बसत आहे.काही दिवसापासून उन्हाचा कडाका वाढला असुन महामार्गांवरून प्रवास करणे अडचणीचे ठरत आहे.काही ठिकाणी निवारा शेड नसल्यामुळे गावागावतील प्रवाश्यांना एसटीची वाट पाहत कडकडीत उन्हात उभे रहावे लागत आहे याकडे ना महामार्ग विभागाचे लक्ष, ना लोकप्रतिनिधीचे लक्ष

         मुंबई-गोवा महामार्गांवरील रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी वनविभागाला दोन वर्षांपूर्वी १७ कोटी निधी वर्ग केला होता. परंतु तेव्हा झाडे लावण्यात आली नाही. याला कारण महामार्गाचे काम पूर्ण झाले नसल्याने आलेला निधी टॅप झाला. आणि झाडे लावण्यात दिरंगाई झाली असल्याचे कारण पुढे करण्यात आला आहे.तर काही ठिकाणी झाडे लावण्यासाठी खड्डे ही मारण्यात आले परंतु झाडे लावण्यात आली नाही. यामुळे या मार्गांवर केव्हा हिरवेगार गतवैभव प्राप्त होईल हे सांगता येत नाही याचा त्रास मात्र प्रवाशी वर्गाला भोगावा लागत आहे.

Comments

Popular posts from this blog