तळा येथे जंगली प्राणी प्रतिबंध प्रात्यक्षिकाचे आयोजन
तळा (कृष्णा भोसले)तळा तालुक्यातील भातपिक, कडधान्य, भाजीपाला व फळ पिकांचे दरवर्षी माकडे, डुकरे इत्यादी वन्य प्राण्यांपासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे बरेचशे शेतकरी शेती देखील करणे बंद करत चालले आहेत. सदर नुकसान टाळण्यासाठी कृषि विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत तळा तालुक्यातील मौजे पिटसई कोंड व रोवळा येथे मंकी रिपेलंट प्रात्यक्षिकाचे आयोजन पेस्टोमॅटिक कंट्रोल कंपनी अहमदनगर यांच्या मदतीने करण्यात आले होते.
यावेळी पेस्टोमॅटिक कंपनी अहमदनगर येथील श्री वसंत टाके, श्री. विनोद सुकेकर यांनी पेस्टोमॅटिक कंपनीने तयार केलेल्या औषधाचा वापर करून उग्रवास व कडूचव या तत्वाचा वापर करून जंगली प्राण्यांना कोणतीही इजा होऊ न देता त्यांना कशा प्रकारे गावापासून, पिकापासून पळवून लावू शकतो याबाबत माहिती दिली. तसेच माकडांसाठी वेगवेगळ्या प्रकारे या औषधाचा उपयोग कसा करायचा याची माहिती देऊन मुरमुर्यामध्ये हे औषध चोळून माकडांना खाऊ दिले व प्रत्यक्ष माकडांची प्रतिक्रिया उपस्थितांना दाखावण्यात आली. या औषधामुळे माकडांच्या तोंडाला कडवटपणा येतो वारंवार वेगवेगळ्या पदार्थांमधून हे औषध खाल्ल्याने माकडांना या ठिकाणी धोका वाटू लागतो व हा संकेत त्यांच्या सर्वग्रुप मध्ये पसरतो व माकडे दूर जाऊ लागतात असे या कंपनीचे म्हणणे आहे. यावेळी बोलताना श्री. आनंद कांबळे तालुका कृषि अधिकारी त्यांनी बऱ्याच वेळा शेतकरी माकडे व डुकरांमुळे शेती करत नसल्याची व्यथा घेऊन येतात. हा प्रयोग यशस्वी झाल्यास एक मोठे यश आपल्याला मिळणार आहे व त्यामुळे तालुक्यातील कमी होत असलेली शेती पुन्हा वाढण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले.
हे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी तालुक्यातील मालूक, कुंबेट आंबेळी, शेनाटे येथील शेतकरी देखील उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी कृषि पर्यवेक्षक सचिन जाधव, कृषि सहाय्यक श्री. गोविंद पाशीमे, श्री. संदीप साळुंके, श्री. डी. दिनेश चांदोरकर ,आत्मा यंत्रणेचे श्री सचिन लोखंडे व गावातील बहुसंख्य महिला व पुरुष शेतकरी, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. शेवटी श्री. सागर वाडकर मंडळ कृषी विभाग यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments
Post a Comment