छत्रपती शिवरायांच्या प्रशासन व्यवस्थेचे आजच्या राजकारण्यांनी अनुकरण करावे ; प्राचार्य अतुल साळुंखे

मराठा समाजाचे भव्यदिव्य किल्ले स्पर्धांचे आयोजन!

कोलाड (श्याम लोखंडे) जे आज देश राज्यातील सर्वच क्षेत्रात उत्तम उदात्त आहे. ते सर्व छ. शिवरायांच्या प्रशासन व्यवस्थेत आहे. छ शिवरायांच्या काळातील अष्टप्रधान मंडळ, शास्त्र नियोजन, न्याय व्यवस्था सर्वच आदर्शवत आहे. दुसरीकडे आजचे राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्याचे मंत्रीगण, प्रधान मंडळ छ. शिवरायांच्या प्रशासन व्यवस्थेची देण आहे आणि म्हणूनच छ. शिवरायांच्या प्रशासन व्यवस्थेचे आजच्या राजकारण्यांनी अनुकरण करावे, तरच सुराज्य निर्माण होईल, असे अभ्यासू प्रतिपादन प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे यांनी केले. रोहा तालुका सकल मराठा समाज आयोजित तालुका स्तरीय भव्यदिव्य किल्ले स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले.

रोहा येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित सालाबादप्रमाणे यावर्षीच्या भव्यदिव्य किल्ले स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रमाला रोहा पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष अप्पा देशमुख, अध्यक्ष नितीन परब, प्राचार्य अतुल साळुंखे, शिवसेना तालुकाप्रमुख समीर शेडगे, पत्रकार राजेंद्र जाधव, प्रेस क्लबचे अध्यक्ष शशिकांत मोरे, सुहास येरूणकर, परशुराम चव्हाण व मान्यवर उपस्थित होते. रोहा तालुका सकल मराठा समाज वर्षभरात सबंध तालुक्यात अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवीत आले आहे. दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांना नेहमीच खाऊ वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते. शालेय मुलांसाठी विविध गड किल्ल्यांवर सहलीचे आयोजन केले जाते. मुख्यत: दरवर्षी भव्यदिव्य तालुका स्तरीय गडकिल्ला बनविण्याच्या स्पर्धा घेतल्या जातत. त्या स्पर्धेत कोलाड, नागोठणे, चणेरा, रोहा परिसर सर्वच विभागातील लहानगे, कॉलेजचे विद्यार्थी भाग घेतात. यावेळी किल्ले स्पर्धा भव्यदिव्य झाली. त्या किल्ले स्पर्धेंचे बक्षीस वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी प्राचार्य अतुल साळुंखे यांनी छ. शिवराय आणि त्यांची प्रशासन व्यवस्था विषयावर उपस्थित विद्यार्थी, नागरिकांना मंत्रमुग्ध केले. छ. शिवरायांचे प्रशासन परमोच्च आदर्श होते. आज देशात जी प्रशासन व्यवस्था आहे. तिचा पाया छ. शिवरायांच्या प्रशासन व्यवस्थेत आहे. मात्र आजची प्रशासन व्यवस्था लोककल्याणासाठी फारशी प्रभावी राहिली नाही. त्यामुळे छ. शिवरायांच्या आदर्श प्रशासन व्यवस्थेचे अनुकरण आजच्या राजकारणांनी करावे, तरच सुराज्य निर्माण होईल, असे स्पष्ट प्रतिपादन प्राचार्य साळुंखे यांनी करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले तर माझ्या प्रशासकीय कामकाज कारकीर्दीत भव्यदिव्य अशी किल्ले स्पर्धा पाहिली नाही, मुलांमध्ये किल्ले, त्यासंबंधी माहिती हे भविष्य घडविण्याचे माध्यम ठरणार आहे, अशी भावना पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी व्यक्त केली. समाजाचे अध्यक्ष आप्पा देशमुख यांनी आपण आदर्शवत शालेय पिढी घडवण्यासाठी कटीबद्ध आहोत, ऊसर भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी लवकरच गड किल्ल्यावर सहल घडवून आणणार आहोत, छ. शिवरायांची प्रशासन व्यवस्था मुलांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत असे देशमुख यांनी सांगितले. किल्ले स्पर्धा बक्षीस कार्यक्रमात समाज बांधव पोलीस नाईक अमित पाटील यांना जलतरणपटू विजेते म्हणून गौरव करण्यात आला. त्यांनी राज्यस्तरावर जलतरण स्पर्धेत राज्यस्तरीय कांस्यपदक प्राप्त केले. अध्यक्ष आप्पा देशमुख यांची जिल्हा दक्षता समितीवर निवड झाल्याबद्दल गौरवण्यात आले.

रोहा तालुका किल्ला स्पर्धेत अडीचशेहुन अधिक स्पर्धकांनी भाग घेतला. यावेळी गीता होम सोसायटी प्रथम, कानिफनाथ मराठा मित्र मंडळ नागोठणे द्वितीय, शिवशंभु मित्र मंडळ अंधारळी तृतीय, जय बिरोबा अंधारआळी, सिताई वॉरियर वाघेश्वर रोठ, जय हनुमान मंडळ राजेवाडी यांना उत्तेजनार्थ, स्वानंद पिंपळे अष्टमी, नवतरुण मित्र मंडळ सोनारआळी, ओम पाशीलकर भुवनेश्वर यांना विशेष कलाकृती म्हणून सन्मानीत करण्यात आले. तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग सन्मानचिन्ह देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण सचिन दळवी, समीर दळवी, अरुण साळुंखे व सहकाऱ्यांनी केले. प्रास्ताविक सुहास येरुणकर यांनी केले. किल्ला स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रमाला समाज बांधव,भगिनी, स्पर्धेक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog