कोलाडच्या आठवडा बाजाराला ४९ वर्षाची परंपरा
सुतारवाडी :( हरिश्चंद्र महाडिक)कोलाड च्या रविवारी भरणाऱ्या आठवडा बाजाराला गेल्या ४९ वर्षाची परंपरा आहे. कोरोना काळात गेल्या वर्षी हा बाजार पूर्णपणे बंद होता. यावर्षी कोरोनाचे नियम पाळून हा आठवडी बाजार आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये सुरु आहे. रविवारी बाजार भरल्या नंतर व्यापाऱ्यांनी किंवा गिऱ्हाईकांनी तोंडाला मास्क लावले आहे किंवा नाही यावर कोलाड पोलीसांचे बारकाईने लक्ष असते. एखाद्याने मास्क लावलेला नसेल तर त्या व्यक्तीस मास्क लावण्यासंबंधी सुचना दिल्या जातात.
गेल्या ४९ वर्षांपूर्वी कोलाड नाक्यावर फारशी लोकवस्ती नव्हती. त्यामुळे रविवारी भरणारा आठवडा बाजार रस्त्याच्या दुतर्फा भरायचा. कोलाड नाक्यावर फारशी दुकानंही नव्हती त्यामुळे रहदारी खूपच कमी होती. कोलाड पासून ८ कि.मी. अंतरावर धाटाव आहे. या ठिकाणी हळूहळू विविध कंपन्या सुरु झाल्या आणि खऱ्या अर्थाने या परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत गेली. कोलाड हे मुंबई - गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्यांची संख्या वाढत गेली. त्यामुळे बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी नागरिकांची संख्या वाढत गेली. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा भरणाऱ्या बाजाराला जागा कमी पडू लागली आणि रस्त्याच्या दुतर्फा भरणारा रविवारचा आठवडा बाजार धोकादायक ठरला. या सर्व गोष्टींची दखल आंबेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. सुरेशदादा महाबळे यांनी घेवून रविवारी भरणारा आठवडा बाजार ग्रामपंचायतीच्या मागील प्रशस्त जागेत भरविण्यास सुरुवात केली. त्यामुळे रायगड जिल्ह्यांतून बाजारासाठी येणाऱ्या असंख्य नागरिकांची अत्यंत महत्वाची व्यवस्था झाली. रस्त्यावरील अपघातांचा प्रश्नही आला नाही . सरपंच सुरेशदादा महाबळे यांच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले. तेव्हा पासून आज तगायत येथील रविवारी भरणारा आठवडा बाजार मोठ्या प्रमाणावर भरत आहे. या बाजारात रायगड जिल्हयातील रोहा, माणगाव, म्हसळा, अलिबाग, श्रीवर्धन, पोलादपूर , मुरुड, कर्जत, तळा, इंदापूर, महाड, माणगाव तसेच अन्य परिसरातील लहान मोठे व्यापारी आपली दुकानं थाटत असतात. कांदा, बटाटा, लसून, वाल, पावटे, चवळी, वाटाणे, हरभरे ही कडधान्य तसेच भाजीपाला, सुकट, बोंबील, वाकट्या, खारवलेले मासे, सोडे, कटलरी सामान, सरबत, ओली मासळी, विविध प्रकारच्या भाज्या तयार कपडे साठवणुकीचे पदार्थ विविध प्रकारच्या मसाल्याचे पदार्थ , हंगामाप्रमाणे कलिंगड, शेंगा, टरबुज अशा विविध वस्तू मोठ्या प्रमाणावर या रविवारच्या बाजारात उपलब्ध असतात.
यामुळे स्थानिकांसह जिल्ह्यातील अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून ही प्रशस्त जागा ही आता अपुरी पडू लागली आहे.
Comments
Post a Comment