सावित्री नदीवरील पुलाप्रमाणे दुर्घटना टाळायची असेल, तर राजापूर येथील ‘दांडे-अणसुरे’ पुलाची दुरूस्ती तातडीने करा
गोवे-कोलाड (विश्वास निकम )
महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४०जणांचा मृत्यू झाला होता. याचप्रमाणे राजापूर तालुक्यातील सागरी महामार्गाजवळ असलेला ‘दांडे-अणसुरे’ पूलही वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे प्रशासनाने या पुलावरून एस्.टी. बसेसची वाहतूक बंद केली आहे; मात्र या पुलावरून खाजगी बसवाहतूक चालूच ठेवली आहे. हा जनतेच्या जिवाशी खेळण्याचा अक्षम्य प्रकार आहे. खाजगी वाहनातून प्रवास करणार्या नागरिकांचे बळी गेल्यास त्याचे उत्तरदायित्व प्रशासन स्वत:वर घेणार आहे का ? या प्रकरणाचे गांभीर्य प्रशासनाने लक्षात घ्यावे. सावित्री नदीवरील पुलाप्रमाणे दुर्घटना टाळायची असेल, तर ‘दांडे-अणसुरे’ पुलाची तातडीने दुरुस्ती करावी आणि तोवर नागरिकांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे रत्नागिरी येथील श्री. संजय जोशी यांनी रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत केली आहे. या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’अंतर्गत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी यांच्याकडे देण्यात आले आहे, अशी माहितीही श्री. जोशी यांनी या वेळी या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री विनोद गादीकर हेही उपस्थित होते.
दांडे-अणसुरे पुलाला जोडलेल्या रस्त्याचा काही भाग खचला आहे. रस्ता आणि पूल यांना जोडणार्या खांबालाही (पिलर) भेगा पडल्या आहेत. पुलाचे ‘जॉईंट’ही काही ठिकाणी निखळले असून त्यामधील स्टीलही गंजलेले आहे. या पुलावर दिव्यांची व्यवस्था, तसेच पुलावर गतिरोधक असल्याचे फलक नाहीत. या पुलाला जोडलेल्या रस्त्याचे बांधकाम सुमारे 4 वर्षांपूर्वीच खचलेले आहे. पुलाच्या धोकादायक स्थितीमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाने या पुलावरील एस्.टी. गाड्यांची वाहतूक बंद केली; मात्र सद्यसिथतीत खाजगी बसवाहतूक सर्रास चालू आहे. वास्तविक हा पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करायला हवा सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेच्या चौकशीअंती महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या समितीने जो अहवाल सादर केला. त्यामधील सूचना या राजापूर येथील पुलासाठीही लागू होतात. त्यामुळे सावित्री नदीवरील दुर्घटनेची पुनरावृत्ती राजापूर तालुक्यातील पुलाच्या बाबतीत घडू नये, यासाठी हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आहोत, असेही जोशी यांनी या वेळी सांगितले.
Comments
Post a Comment