जावटे येथील रहदारीच्या पुलाला कठडे आवश्यक!
वाढलेल्या गवतामुळे पुल काठडे दिसेना!
अपघाताची शक्यता!
सुतारवाडी ( हरिश्चंद्र महाडिक ) सुतारवाडी पासून पाच कि.मी. अंतरावर जावटे गाव आहे. येथून माणगाव, निजामपुर, इंदापुर, भाले या मार्गाकडे जाणारा सुसज्ज रस्ता आहे. या रस्त्याला छोटासा पुल आहे. मात्र या पुलाला दोनही बाजूला संरक्षक कठडे नाहीत.
पूर्वी या पुलाला संरक्षक कठडे होते. मात्र गेल्या दहा वर्षापासून येथील संरक्षक कठडे गायब झालेले आहेत. पावसाळ्यात सर्वत्र गवत उगवतो या गवताने पुलाच्या दोनही बाजू झाकून गेलेल्या अवस्थेमध्ये सध्या आहेत. मुख्य म्हणजे या पुलावरून दुचाकी, चारचाकी वाहनं तसेच एस.टी.ची गाडी जात असते. या छोट्या पुलावर वाढलेल्या गवतामुळे या ठिकाणी पुल आहे की नाही हे लक्षात येत नाही. हा छोटासा पुल साधारणपणे 10 ते 15 फुट खोलवर आहे. गवताच्या आच्छादनामुळे पुल दिसत नसल्यामुळे एखादया वेळेस या पुलावर दोन वाहनं आली, किंवा साईड काढण्यासाठी एखादे वाहन गेले तर ते पुलाखाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे धोका टाळण्यासाठी तसेच अपघात होण्यापूर्वी संबंधित खात्याने लक्ष देऊन या छोट्याशा पुलाला कठडे बांधणे आवश्यक आहे.
या वर्षी डिसेंबर महिन्यात ही पाऊस पडत होता त्यामुळे जागोजागी वाढणाऱ्या गवताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून येते. अशाच गवताने वेढलेला हा पुल आहे त्याला संरक्षक कठड्यांची गरज आहे. या पूर्वी सुतारवाडी, वाळंजवाडी येथील पुलाचे कठडे गायब होते. वर्तमानपत्रा मध्ये बातमी प्रसिद्ध होताच त्या ठिकाणी संरक्षक कठड्यांची व्यवस्था करण्यात आली.
Comments
Post a Comment