महिला सक्षमीकरणासाठी सुदर्शन केमिकल्सला!
बेस्ट कॉर्पोरेट एचआर प्रॅक्टिस अवार्ड' प्रदान!
तीनही शिफ्टमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत 'एनएचआरडीएन'तर्फे सन्मान!
कोलाड (श्याम लोखंडे ) तीनही शिफ्टमध्ये सर्व विभागा3त महिलाना काम करण्याची संधी देत महिला सक्षमीकरणात पुढाकार घेणाऱ्या धाटाव (रोहा) एमआयडीसीतील सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीजला 'बेस्ट कॉर्पोरेट एचआर प्रॅक्टिस अवार्ड' प्रदान करण्यात आला. द नॅशनल एचआरडी नेटवर्कतर्फे (एनएचआरडीएन) आयोजित 'एचआर शोकेस २०२१'मध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कॉर्पोरेट क्षेत्रातील विविध कंपन्यांना आपली मनुष्यबळ कार्यप्रणाली प्रदर्शित करण्याची अनोखी संधी यामधून देण्यात आली.
'एनएचआरडीएन' नेतृत्व विकासाचे जागतिक केंद्र आणि मनुष्यबळ व्यावसायिकांची राष्ट्रीय प्रधान संस्था आहे. 'बेस्ट कॉर्पोरेट एचआर प्रॅक्टिस'चे दर्शन घडवत सुदर्शन केमिकल्सने कंपनीतील केमिकल प्लांटमध्ये केवळ कार्यालयीन कामकाजच नाही, तर तंत्र, उत्पादन, टेस्टिंग, संशोधन, नियोजन अशा सर्वच विभागात महिला कर्मचाऱ्यांना सामावून घेत 'जेंडर स्मार्ट बिझनेस सोल्युशन्स'चे उदाहरण घालून दिले आहे. उत्पादन क्षेत्रातील अग्रेसर कंपनीत महिलांना अधिकाधिक संधी देण्याच्या उपक्रमाचे याआधीही विविध स्तरांवर कौतुक झाले आहे.
'एचआर शोकेस'मध्ये एकूण १०० कंपन्यांनी सहभाग घेतला होता. त्यातील २४ संस्थांची निवड अंतिम फेरीत झाली. अंतिम फेरीतून सुदर्शन केमिकल्सला उत्कृष्ट महिलाकेंद्रित मनुष्यबळ व्यवस्थापनासाठी हा सन्मान मिळाला. विविध टप्प्यांवर उल्लेखनीय कामगिरी करत झालेली ही निवड सुदर्शन केमिकल्ससाठी आनंददायी आहे. महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट ठेवून सुदर्शन केमिकल्स महिलांना सर्व विभागात तीनही शिफ्टमध्ये काम करण्याची संधी देत आहे. एवढेच नाही, तर या सर्वच महिलांनी उत्तम कामगिरी करत कंपनीच्या प्रगतीत योगदान दिले आहे, असे एचआर प्रॅक्टिसेसच्या प्रमुख शिवालिका पाटील यांनी सांगितले.
Comments
Post a Comment