रायगड पोलीस दल, राज्यातील "बेस्ट पोलीस युनिट अवॉर्ड" विजेता
अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ
अलिबाग, (जिमाका):- राज्यात पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ट पध्दतीने काम करणे, तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्ह्याचा तपास, त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या संबंधित पोलीस अधिकारी / कर्मचारी यांना प्रोत्साहीत करणे इत्यादी हेतू साध्य करण्यासाठी "सर्वोत्कृष्ट पोलीस घटक पुरस्कार" प्रदान करण्याची बाब महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाच्या विचाराधीन होती.
या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या निवड प्रक्रियेतून रायगड जिल्हा पोलीस दलाची "बेस्ट पोलीस युनिट अवॉर्ड (Best Police Unit Award)" साठी निवड करण्यात आली आहे.
कामाच्या मूल्यांकनाचे निकष सकारात्मक, नकारात्मक मापदंड (Parameters) इत्यादीच्या अनुषंगाने घटकातील पूर्ण वर्षात (जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२०) दाखल गुन्ह्यांची माहिती विचारात घेऊन वार्षिक गुन्हेगारीच्या आधारावर तंतोतंत श्रेणी तयार न करता "कॅटेगरी A" - वार्षिक आयपीसी गुन्हे 6 हजार पेक्षा कमी असलेले जिल्हे/ आयुक्तालये, "कॅटेगरी B"- वार्षिक आयपीसी गुन्हे 6 हजार पेक्षा जास्त असलेले जिल्हे/ आयुक्तालये आणि "कॅटेगरी C"- पोलीस आयुक्तालय बृहन्मुंबई यांच्या अधिपत्याखालील सर्व घटक अशा तीन श्रेणीमध्ये घटकांची विभागणी करण्यात आली होती.
यापैकी "कॅटेगिरी A" मधून रायगड पोलीस दलाची "बेस्ट पोलीस युनिट अवॉर्ड" साठी निवड करण्यात आली आहे. याबाबत अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेन्द्र सिंह यांच्या स्वाक्षरीने आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत.
या निवडीबद्दल पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ व संपूर्ण रायगड पोलीस दलाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment